चंद्रपूर - वाघांची एकूण स्थिती जाणून घेण्यासाठी 'ट्रांझेक्ट लाईन सर्व्हे' (transect line survey) केला जातो. 20 नोव्हेंबर 2021 ला ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोलारा गेट परिसरात पथकासह गस्तीवर असताना स्वाती धुमणे या महिला वनरक्षकाचा वाघाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा सर्व्हे अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला होता. मात्र, या सर्व्हेचे महत्त्व आणि आवश्यकता बघता हे सर्व्हेक्षण पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच्या सर्व उपाययोजना करूनच हा सर्व्हे केला जाणार आहे, अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर ( Jitendra Ramgaonkar inform on tiger Survey ) यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
हेही वाचा - Tadoba Tiger Reserve : आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून ताडोबा पर्यटनाला होणार पुन्हा सुरुवात
बचाव करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले
2006 पासून देशामध्ये दर चार वर्षांनी व्याघ्र प्रगणना राबविली जाते. भारतीय वन्यजीव संस्थान (डेहराडून) आणि राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण (national tiger conservation authority) यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रगणना होत असते, ज्याला ट्रांझेक्ट लाईन सर्व्हे असे म्हणतात. 20 नोव्हेंबरला ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोलारा गेट परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त असताना स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे, हा सर्व्हे करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. यानंतर हे सर्व्हेक्षण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा सर्व्हे पुनः सुरू करण्यात येणार आहे. यावेळी वनकर्मचाऱ्यांवर वन्यजिवांचा हल्ला झाला तर, यावेळी स्वतःचा बचाव करावा यासाठीचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले.
बचावासाठी या वस्तू खरेदी करण्यात आल्या
जंगलात वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी कुठलेही अवजार किंवा हत्यार वापरू शकत नाही. मात्र, निदान आपला बचाव करण्यासाठी पेपर स्प्रे, विशेष काठी, छोट्या करंटचा झटका देणारी अशी उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. सोबतच खुल्या जिप्सीतून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना जिप्सीसारखे वाहन आणखी कसे सुरक्षित करता येईल यासाठीच्या संकल्पना आणि प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात याच्या डिझाईन आल्या नाहीत. मात्र, या दृष्टीने ताडोबा व्यवस्थापन कार्यरत असून लवकरच याबाबत ठोस तोडगा काढला जाईल, अशी माहिती ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर ( Jitendra Ramgaonkar ) यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
हेही वाचा - Chandrapur Double Murder Case : 'त्या' दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपी अखेर चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात