चंद्रपूर - जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी आजपासून खुला करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचारी-जिप्सीचालक-पर्यटक-गाईड यांनी या क्षणी आनंद व्यक्त केला आहे. कोविड नियमांचे पालन करून हा प्रवेश दिला जाणार आहे. 18 मार्च पासून पर्यटन बंद असल्याने अर्थचक्रावर विपरीत परिणाम झाला होता. व्याघ्र प्रकल्प खुला झाला असला तरी, कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या पर्यटकांना मात्र नाकारला जाणार आहे.
हेही वाचा - भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन; नागरिकांच्या गैरसमजुती दूर करणार वनविभाग
एखाद्या पर्यटकाला कोविड सदृश्य लक्षणं आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येणार आहे. या हंगामापासून ताडोबाच्या नोंदणीसाठी नवी वेबसाईट देखील कार्यान्वित झाली असून आता mytadoba.org या साईटवर ताडोबा प्रवेश बुकिंग करता येणार आहे. दरम्यान, आज पर्यटनाचा प्रारंभ करताना क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी प्रवेशद्वारावर पूजा केली. आणि पर्यटनासाठी द्वार खुले केले. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा प्रतिसाद दिसून आला.
मरगळ आलेल्या मोहर्ली या गावात आज चैतन्य दिसले. याच गावात ताडोबाचे प्रवेशद्वार असल्याने इथेच हॉटेल, रिसॉर्ट, छोटे-मोठे व्यवसाय, चहाटपऱ्या आहेत. यातून गावाला अर्थार्जन होते. गेल्या सहा महिन्यांपासून हे अर्थचक्र थांबले होते. पण आता ते नव्याने सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. गेले सहा-सात महिने कोरोनाच्या दहशतीने स्वतःला घरात कोंबून घेणाऱ्या लोकांना या संधीमुळे बाहेर पडता आले. मोकळा श्वास घ्यायला मिळत आहे. याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसू लागलाय. ताडोबा सुरू करणे ही मागणी स्थानिकांच्या रोजगार आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : वन्यजीवांच्या संरक्षणासाठी 'त्या' सदैव तत्पर