चंद्रपूर - 20 नोव्हेंबरला गस्तीवर असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू (Forest guard killed in Tiger Attack) झाला होता. यामुळे पर्यटकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याची गंभीर दखल ताडोबा व्यवस्थापनाने (Tadoba-Andhari Tiger Reserve) घेतली आहे.
पर्यटक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. एवढेच नव्हे तर जिप्सीसारखे वाहन आणखी कसे सुरक्षित करता येईल यासाठीच्या संकल्पना आणि प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासाठी एक स्पर्धा ताडोबा व्यवस्थापनाने आयोजित केली (Tadoba Management Competition Organized) आहे. यात सर्वोत्कृष्ट संकल्पनेला 25 हजारांचा रोख पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यानंतर संकल्पनेची अमलबजावणी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- वाघाच्या हल्ल्यात वनरक्षकाचा झाला होता मृत्यू -
20 नोव्हेंबरला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोलारा गेट परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त असताना स्वाती ढुमणे या महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पर्यटक देखील खुल्या जिप्सीने सफारी करत होते. ताडोबातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे वनकर्मचारी आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. केवळ ताडोबातच नव्हे तर देशभरातील व्याघ्रप्रकल्पात खुली जिप्सी वापरली जाते. मात्र, या खुल्या जिप्सीबाबत सुरक्षेच्या दृष्टीने मागील काही वर्षांपासून चर्चा सुरू झाली आहे. वाघाने हल्ला केला तर जिप्सीतील पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यापूर्वी देखील अशाप्रकारच्या घटनांची नोंद झाली आहे, मात्र, कुणाचा मृत्यू यात झाला नाही. पण ताडोबात वनरक्षकाचा मृत्यू झाल्याने ताडोबा व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत जिप्सीचालक, मालक, गाईड आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांशी चर्चा करण्यात आली. याबाबत स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- अशी आहे स्पर्धा -
जिप्सी आणखी कशी सुरक्षित करता येईल, त्यासाठी नेमकी कशी डिझाईन प्रत्यक्षात आणता येईल या संदर्भात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी तज्ज्ञ लोकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत ज्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर ठेवण्यात आली आहे. यानंतर तज्ज्ञ परीक्षकांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट डिझाइनला पुरस्कृत करण्यात येणार आहे. 25 हजार रोख असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. त्यानंतर ही संकल्पना ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात राबविण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.