चंद्रपूर - राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध करायची, अशी महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत भाजपाची भेट घेतली. मात्र, भाजपाने आपला हट्टीपणा सोडला नाही. त्यांनी उमेदवार उभा केला, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ( Supriya Sule Criticized Bjp On Rajyasabha Election ) आहे.
सर्व राजकीय मंडळी सध्या अयोध्येला जाणार आहे. आपण अयोध्येला जाणार का?, असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी भारत एक खोज हे पुस्तक वाचले आहे. काश्मिर ते कन्याकुमारी सारा देश एक आहे, असे सांगत त्यांनी अयोध्या दौऱ्याच्या प्रश्नाला बगल दिली.
विदर्भाला राष्ट्रवादीने नेहमीच झुकते माप दिल्याचा आरोप होतो. त्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटलं की, राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाचे गुहखाते विदर्भातील अनिल देशमुख यांच्याकडे सोपविले. परंतु, नागपूरवरुन त्यांच्यावर आरोप झाले. त्यांच्या कुटुंबियांवर तब्बल १०४ वेळा छापे टाकण्यात आले. हा विदर्भावर दिल्लाचा अन्याय आहे. ज्याने आरोप केले, अटक झाली तो आता माफीचा साक्षीदार झाला आहे. समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. महामागाईने माणसं त्रस्त झाली आहे. त्यावर बोलण्याची गरज आहे, असेही सुळेंनी स्पष्ट केलं आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर बोलताना मी खासदार म्हणून समाधानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील चर्चा सुप्रिया सुळेंनी फेटाळून लावली आहे.
अपक्ष आमदारांच्या घरी भेट - चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी सुप्रिया सुळेंनी भेट दिली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांच्या मतांचे वजन वाढले आहे. यापार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अनेक दिवसांपासून जोरगेवार यांच्या गृहभेटीचे आमंत्रण होते. ते आज पूर्ण केले. यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नका, अशी विनंतीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.
हेही वाचा - Minister Rajesh Tope : कोरोनाचे सावट असले तरी वारी होणारच; आरोग्यमंत्र्यांची माहिती