चंद्रपूर - राजुरा येथील इंफॅन्ट जिझस सोसायटीच्या अनुसया आदिवासी मुलींच्या वसतिगृहात झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. पोलीस तपासाबाबत नागरिक समाधानी नसल्याचे यात नमूद केले आहे.
या प्रकरणात पोलीस तपासाबाबत असमाधानी असलेल्या पीडित मुलींच्या पालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या निगराणीत संपूर्ण तपास करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले होते. आता याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यांचे एकूणच राजकीय वजन बघता या प्रकरणाची सीआयडी चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
मुनगंटीवारांच्या पत्रात पोलिसांच्या तपासाबाबत ताशेरे ओढले असून तपासाबाबत नागरिक समाधानी नाहीत. दिवसेंदिवस याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राजुरा येथील निघालेला महाआक्रोश मोर्चा हा याचेच द्योतक आहे. यामुळे राजुऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून याला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने असल्याने हे प्रकरण दडपण्यात येईल, अशी शंका नागरिकांना आहे. त्यामुळे याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी यात केली आहे.