चंद्रपूर - राजस्थानच्या कोटा येथे शिकणारे चंद्रपूर येथील विद्यार्थी शहरात परतले आहेत. 3 एसटी बसेस मधून 51 विद्यार्थी शहरात दाखल झाले. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड उपचार कक्षात प्राथमिक तपासणी करण्यात आली. यातील कुणाला कोरोना लक्षणे आढळल्यास आयसोलेशन वार्डात दाखल केले जाणार आहे. विद्यार्थी चंद्रपूरमध्ये परतल्याने पालकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
धुळे आगाराच्या 3 एस.टी. बसमधून कोटा येथे शिकणारे चंद्रपूरचे विद्यार्थी शहरात परतले. यासाठी या एस. टी. बसेसचा सुमारे 2000 किमी चा प्रवास झाला. या बसच्या माध्यमातून एकूण 51 विद्यार्थी शहरात आले आहेत. चंद्रपुर जिल्हा सीमेवर पोलिसांनी या बसेसना वाट दाखवत सर्व बसेस थेट जिल्हा रुग्णालयातील कोविड उपचार कक्ष परिसरात दाखल करण्यात आल्या. या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि चालक-वाहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. कोटा ते चंद्रपूर प्रवासात काही ठिकाणी या विद्यार्थ्यांना थांबवून भोजन पाणी पुरविण्यात आले. हे विद्यार्थी अडचण आणि भीतीच्या छायेतून बाहेर आल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले. कोटा येथून आलेल्या विद्यार्थ्यामध्ये लक्षणे आढळलेले विद्यार्थी आयसोलेशन वॉर्डात ठेवले जाणार आहेत. सुदृढ असलेले विद्यार्थी घरीच क्वारंटाईन केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार स्वतः या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.