चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावात शुक्रवारी रात्री आलेल्या वादळाने कहर केला. यात ३० ते ४० घरांची पडझड झाली आहे. वादळाच्या तडाख्याने ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील काही भागात शुक्रवारी रात्री मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. अर्धा तास वादळाने झोडपल्याने सकमूर गावाचे अतोनात नुकसान झाले आहे. गावातील चार ते पाच घरांवर झाडे कोसळली आहेत. यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर गावातील, गावाबाहेरील १० ते १५ विद्युत खांब कोलमडल्याची माहिती आहे.
सकमूर गावापासून जवळच असलेल्या वेडगावालाही वादळाचा तडाखा बसला आहे. या वादळात गावाचे प्रवेशव्दार कोसळले. तर गावातील किसान विद्यालयाचे संपूर्ण छत उडाले. विनोद केशट्टीवार यांच्या शेतातील कुकुटपालन केंद्राचे शेड कोसळले. यात एक हजार कोंबडीचे पिल्ले मरण पावली आहे. गुजरीजवळ असलेल्या अशोक रेचनकर यांच्या शेतातील आठ एकरमधील मक्याचे पीक आडवे झाले.