चंद्रपूर - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी यात सहभाग घेतला. त्यामुळे जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
राजकीय पक्षांसह विविध संघटनांचा सहभाग -
कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. मात्र, ती निष्फळ ठरली. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबरला देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार चंद्रपूर येथे देखील हा बंद पाळण्यात आला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष या प्रमुख राजकीय पक्षांसह यंग चांदा ब्रिगेड, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, भूमिपुत्र ब्रिगेड, शेतकरी संघर्ष समिती, जनविकास सेना आदी संघटनांनी सहभाग नोंदविला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जनता कॉलेज चौकात निदर्शने केली. तसेच काँग्रेसच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने बाईक रॅली काढून या बंदला समर्थन दिले. भूमिपुत्र ब्रिगेड आणि शेतकरी संघर्ष समितीने जटपुरा गेटसमोर निदर्शने केली. वंचित बहुजन आघाडी आणि यंग चांदा ब्रिगेडतर्फे रॅली काढण्यात आली. चंद्रपूर येथील शीख बांधवानी ट्रॅक्टरने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. एकंदरीत या बंदमध्ये अनेक राजकीय पक्ष आणि संघटना सहभागी झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात हे आंदोलन यशस्वी झाले.