चंद्रपूर - अवकाशातून पडलेल्या तुकड्यांचा सिंदेवाही तालुक्यात सध्या युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. यासाठी तलाठी आणि पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असून त्याचा शोध घेतला जात आहे. जमा करण्यात येणाऱ्या सर्व वस्तू तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिली. काल (शनिवारी) रात्री अचानक आकाशात उल्कापात होत असल्याचे आढळून आले. मात्र हा कुठला उल्कापात नसून एक उपग्रह सोडताना त्याचे आकाशातून पडलेले तुकडे होते ही बाब समोर आली. यातील एक मोठा तुकडा सिंदेवाही येथील लाडबोरी या गावात पडला. ऐन गावाच्या मधोमध पडला. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
प्रतिक्रिया देताना तहसीलदार जवळपास चाळीस किलोंची एक गोल तबकडी एका खाली प्लॉटवर पडली. यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच ही तबकडी सिंदेवाही पोलीस ठाण्यात आणण्यात आली. तहसीलदार यांच्या निर्देशानुसार या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि तलाठीचे पथक नेमण्यात आले. त्यानुसार आज (रविवारी) सकाळी पवनपार येथिल एका तलावालगत साधारण पाच किलोचा धातूचा गोळा आढळून आला. तो देखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रत्येक गावात जाऊन पथकाकडून विचारणा केली जात आहे. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असल्याने जंगलातही याचे तुकडे पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संपूर्ण वस्तूंची पाहणी करण्यासाठी नागपूरहुन खगोलशास्त्रीय टीम सिंदेवाहीत पोचणार असल्याची माहिती तहसीलदार जगदाळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.आणखी एक गोळा सापडला - त्यानंतर दिनांक ३ एप्रिलला सकाळी पवनपार-टेकरी जंगल परिसरात मोहफूल वेचण्याकरिता गेलेल्या काही नागरिकांना आणखी एक काळ्या रंगाचा गोळा पडलेला दिसून आला. तर दुसरा गोळा मरेगाव येथील रत्नमाला रमेश नैताम ह्या मोहफूल वेचण्याकरिता जंगल परिसरात गेल्या होत्या त्यांना एक मोठा अंदाजे ३ ते ५ किलोचा काळ्या रंगाचा धातूचा गोळा दिसून आला. नैताम यांनी ही माहिती सरपंच देवानंद सहारे यांना दिली. सरपंच व गावकरी नैताम यांना घेऊन त्या ठिकाणी पोहचून त्या गोळ्या ला ग्रामपंचायत कार्यालयात आणले व याची माहीती तालुका प्रशासनाला दिली. मरेगाव येथे मिळालेला गोळा पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले असल्याची माहिती सरपंच मरेगाव यांनी दिली.हेही वाचा - अमरावती नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी आकाशात दिसल्या उल्कावर्षावासारख्या शलाका