चंद्रपूर - ज्या जावयाचा पाहुणचार केला, ज्याला मानपान दिला. त्याच जावयाने स्वतःच्या सासूच्या घरीच घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या अट्टल जावयाचे नाव पृथ्वी अशोक तायडे असे आहे. त्याला दिर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.
मात्र घरात संशयास्पद असं कोणीच आढळल नव्हतं-
दुर्गापुरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहणाऱ्या गंगा विजयकर यांच्या घरी सोमवारी चोरी झाल्याची तक्रार दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. विजयकर यांचा घरून सोन्याचे दागिने, एकूण 1 लाख 37 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. त्यानंतर दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुर्गापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, सुनील गौरकार, मनोहर जाधव व सूरज लाटकर यांनी तपास सुरू केला. घरच्यांची विचारपूस केली. मात्र घरात संशयास्पद असं कोणीच आढळल नव्हतं.
आणि सासूबाईला बसला मोठा धक्का -
एक जावई आले होते. ते चोरी कसे करू शकतील. हा प्रश्न सासुबाईसमोर उभा ठाकला. मात्र, पोलीसांची संशयाची सुई त्याच्यावरच होती. चौकशी केली असता तो थातुरमातूर उत्तरे द्यायला लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलीसी खाक्या दाखवताच पृथ्वी तायडे पोपटासारखा बोलू लागला. आरोपी हा कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील आहे. त्याचे लग्न गंगा विजयकर यांच्या मुलीशी झाले होते. जावयाने आपणच ही घरफोडी केल्याचे कबुल केले आणि सासूबाईला मोठा धक्का बसला.
चोरट्या जावयाला अटक-
अखेर या चोरट्या जावयाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावर पोलिसांनी भादवी कलम 380 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.
हेही वाचा- 'मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडू यांचा राजीनामा घेतला असता'