चंद्रपूर - डिजिटल इंडियाच्या युगात गोंडपिपरी तालुक्यातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील नांदगाव, हेटी नांदगाव, टोले नांदगाव या गावातील महिलांना हा प्रवास करून वाळूचा उपसा करावा लागतो, हाताने खोल खड्डा केल्यावर वरचे पाणी त्यांना गोळा करावे लागते. याच त्रासामुळे गावातील तरुणांची लग्न होण्यास मोठी समस्या निर्माण होत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव, हेटी नांदगाव, टोले नांदगाव या गावातील ही भीषण समस्या आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत नळाद्वारे सात गावातील नागरिकांना घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षितपणामुळे कधी दूषित पाणी पुरवठा होतो, तर कधी कधी पंधरा पंधरा दिवस पाणी बंद असते. अशा वेळेस येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी लगतच्या नाल्यातील पाणी (चुहा) उपसा करून आणावे लागत आहे. पाण्याची ही गंभीर समस्या फक्त उन्हाळ्यातच नाही तर बाराही महिने असते. सोशल मीडियावर अनेकदा याबाबत बातम्या प्रकाशित करण्यात आल्या, मात्र प्रशासन यावर उपाययोजना करण्यासाठी समोर येत नसल्याचे चित्र आहे.
मूलभूत अधिकाराचे उल्लंघन - भारतीय राज्यघटना कलम 21 - अ मध्ये नमुद मूलभूत अधिकारात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. असे असतानाही प्रशासनाकडून मात्र या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. एकंदरीत नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केल्या जात आहे.
गावात लग्नासाठी मुली देण्यास नकार - गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव, टोले नांदगाव, हेटी नांदगाव या गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होत नसल्याने आणि गृहिणींना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने येथील युवकांना वधू मिळणे कठीण झाले आहे. या गावांचे नाव घेतल्यास वधू पित्याकडून चक्क नकार दिल्या जात असल्याची आपबिती येथील युवक स्वतः पुढे येऊन सांगत आहेत.
उपसरपंच देखील भरतात घागरी - सामान्य नागरिकच नव्हे तर येथील उपसरपंच मालताबाई तांगडे यांना सुद्धा घागर घेऊन याच ठिकाणी पाणी भरायला जावे लागते. आम्हाला पर्याय नाही, पाठपुरावा करून देखील स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही, जोवर ही स्थिती राहील तोवर पाणी भरण्याशिवाय पर्याय नाही, असे त्या म्हणाल्या.
कंत्राटदारावर कारवाईची मागणी - सकमूर येथील पाणीपुरवठा योजना ही सपशेल अपयशी ठरली आहे. योजनेच्या कंत्राटदारामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे, या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी सकमूर गावातील माजी उपसरपंच शाहीराज अलोने यांनी केली आहे.
हेही वाचा - Heat Wave Chandrapur : उष्ण शहरांच्या यादीत चंद्रपूर पाचव्या स्थानी; शुक्रवारी 46.4 अंश सेल्सिअसची नोंद