चिमूर (चंद्रपूर)- कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर गरज असलेल्या सर्वाना आणि रेशनकार्ड नसणाऱ्यांना मोफत धान्य मिळावे. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी सुरक्षित पोचविण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत. लॉकडाऊनमध्ये ज्या मजूर, कामगारांना त्यांचे वेतन मिळाले नाहीत, त्याचे थकीत वेतन देण्यात यावे, अत्यावश्यक सेवा देणारे सर्व कामगार व मनरेगा कामगार मजुरांना दुप्पट वेतन देण्यात यावे, आदी विविध मागण्याकरिता १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत उपवास करणार आहेत. ही माहिती कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे यांनी दिली.
या नाविन्यपूर्ण आंदोलनाअंतर्गत महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यातील १३५ प्रमुख कार्यकर्ते, नेते, अभ्यासक, कलाकार, नाटककार यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ते व सामान्य नागरिक आपल्याच घरी बसून उपवास करणार आहेत. या आंदोलनात उपासमारीवर मात करण्यासाठी गरज असलेल्या सर्वांना रेशन कार्ड नसले तरी मोफत धान्य मिळाले पाहिजे. राज्यांतर्गत स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी परत नेण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी, लाॅकडाऊन मधे ज्या मजूरांना रोजगार बंद ठेवावा लागला त्या सर्वांना त्यांचे थकीत वेतन व देय वेतन मिळण्यासाटी तालुका व जिल्हा स्तरावर यंत्रणा कार्यरत करण्यात यावी, अत्यावश्यक सेवा बजावणा-या सर्व कर्मचा-यांना दुप्पट पगार द्यावे व पन्नास लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.
बांधकाम कामगार व मनरेगा मजूर जे सरकारच्या रेकाॅर्डवर आहेत, त्यांचा रोजगार सक्तीने बंद केल्यामुळे त्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांचे या काळातील किमान वेतन त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात यावे. यासाठीचा निधी शासनाकडे आहे, या काळात घसरलेल्या आर्थिक वाढीच्या दराचा बोजा कामगार वर्गाच्या माथी मारून कामगार विरोधी धोरणे व कायदे करण्यात येऊ नयेत, शेतक-यांना त्यांच्या शेतमालाचे लाॅकडाऊनच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात यावी, लाॅकडाऊन संपवण्याची रणनीती विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींसोबत चर्चा करून ठरवण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनाबाबत माहिती देताना सुरेश डांगे म्हणाले, ही कृती सरकार विरोधी नाही, सरकारला त्यांच्या संविधानिक जबाबदारीचे भान करून देण्यासाठी जागृत नागरिकांनी उचललेले सजग पाऊल आहे. तसेच संपूर्ण देश व देशातील संपन्नता ज्यांच्या अमूल्य योगदानावर व श्रमावर उभी असते त्या कामगार व शेतकरी वर्गाप्रती आपले उत्तरदायीत्व व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे असे आम्ही मानतो.
या उपवास कृतज्ञतेचा...संविधानिक जबाबदारीचामध्ये अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, अभ्यासक, कलाकार, साहित्यिक, नाटककार,पत्रकार सहभागी होत आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन डाॅ. बाबा आढाव, उल्का महाजन, साथी सुभाष लोमटे, नितीन पवार,चंदन कुमार ,मुक्ता श्रीवास्तव, विलास भोंगाडे, सुरेश डांगे, एकनाथ गजभिये, सुधाकर महाडोले, नंदकिशोर अंबादे आदीने केले आहे.