चंद्रपूर : महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला चंद्रपुरात गालबोट लागले. काही अतिउत्साही शिवसैनिकांनी चक्क शिवभोजन थाळी देणाऱ्या हॉटेलची तोडफोड केली. यात मालकाचे मोठे नुकसान झाले. शिवभोजन थाळी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाचा उपक्रम असतानाही तोडफोड झाली.
शिवभोजन देणाऱ्या हॉटेलची तोडफोड गोरगरिबांना अत्यंत कमी पैशात चांगल्या जेवणाची सुविधा मिळावी, कोणीही उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे अवघ्या दहा रुपयांत थाळी मिळते. उत्तरप्रदेश येथील लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर गाडी चालविण्यात आली. ज्यात नऊ लोकांचा मृत्यु झाला होता. या विरोधात सोमवारी महाविकास आघाडीने बंद पुकारला होता. यात बसस्थानक समोरील मयूर शिवभोजन थाळीचे हॉटेल सुरू होते. यावेळी पुढचे मागचे न पाहता अतिउत्साही शिवसैनिकांनी थेट तोडफोड सुरू केली. तेथे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फलक होते, त्यालाही सोडले नाही. ह्या प्रकरणात मालकाने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार केल्याचे कळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागून मनधरणी केली. त्यामुळे हे प्रकरण निवळले. मालकाला नुकसान भरपाई देणार
या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. जे झालं ते चुकीचं झालं. त्यानुसार आम्ही मालकाची जाहीर माफी मागितली आहे, तसेच जेवढे काही नुकसान झाले त्याची पै न पै आम्ही भरून देणारे आहे. अशी स्पष्टोक्ती गिर्हे यांनी दिली.
हेही वाचा - भाजपाला सत्तेची मस्ती, अद्यापही केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही - सुप्रिया सुळे