चंद्रपूर - कोरोनाच्या काळात सर्व शाळा बंद असल्याने सर्वांनी आता ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गाला हा प्रकार परवडणारा आहे. मात्र, रोजंदारी, मजुरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन असण्याची शक्यता नाहीच्या बरोबरच आहे. याकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे.
'शिक्षक आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम मनपाच्या शिक्षण विभागाने सुरू केला आहे. इतर शाळा आणि कॉन्व्हेंटप्रमाणे मनपाच्या शिक्षण विभागाने देखील ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू केले. यासाठी अँड्रॉईड फोन लागतो. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या पालकांना दोन वेळच्या जेवणासाठीचा संघर्ष करावा लागतो. अशावेळी त्यांनी स्मार्टफोन आणायचा कुठून हा प्रश्न पालकांसोबतच मनपालाही पडला. केवळ 10 टक्के पालकांकडेच स्मार्टफोन होता. त्यातही घरी एकच फोन असल्यामुळे त्यांना तो आपल्यासोबत कामावर घेऊन जावा लागायचा. यावर मनपाचे शिक्षणाधिकारी नागेश नीत यांना अभिनव कल्पना सुचली.
विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवणी द्यायची आणि एक आठवड्याचा गृहपाठ द्यायचा असा हा उपक्रम आहे. या उपक्रमाला महापौर राखी कांचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांनी लगेच पाठिंबा दिला. त्यानुसार आता 'शिक्षक आपल्या दारी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
असा आहे हा उपक्रम -
संबंधित शाळेतील शिक्षक-शिक्षिका हे विद्यार्थ्यांच्या परिसरात जातात. तेथील एकाच्या घरी जवळपास पाच ते सहा विद्यार्थ्यांना तिथे बोलाविण्यात येते. यावेळी विद्यार्थ्यांना विविध विषयावरचे धडे शिकविण्यात येतात. तसेच पुढील आठवड्याचा गृहपाठ दिला जातो. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्यांना हाच पाठ शिकवला जातो. यादरम्यान अर्थात कोरोनाचे सर्व नियम कटाक्षाने पाळले जातात. यामुळे कोरोनाकाळात खंड पडलेले शिक्षण सुकर झाले आहे.
मनपाची शैक्षणिक स्थिती -
महापालिकेच्या शहरात पहिली ते दहावीपर्यंतच्या एकूण 29 शाळा आहेत. त्यात 2 हजार 400 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 74 शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व 74 शिक्षकांनी दररोज दहा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाचे धडे द्यायचे आहेत. तर या उपक्रमाला पालकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.