चंद्रपूर - जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. यात वयोवृद्ध गटातील महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. ही संतापजनक घटना दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक येथे शनिवारी घडली. यात पाच जण जबर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकार?
21 व्या शतकात आजही समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. नरबळीचा प्रयत्न, अंधश्रद्धेतुन लोकांना सामूहिक मारहाण असे प्रकारही चंद्रपूर जिल्ह्यात घडले आहेत. याचा कळस जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात दिसून आला. वणी बुद्रुक या गावात अंधश्रद्धेचा पगडा आहे. शनिवारी काही महिलांच्या अंगात आले. त्यांनी पीडित लोकांची नावे सांगितली. यानंतर गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी गावातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमध्ये शांताबाई भगवान कांबळे (53), साहेबराव एकनाथ हुके (48), धम्मशिला सुधाकर हूके (38), पंचफुला शिवराज हुके (55), प्रयागबाई एका जबर जखमी झाले. या प्रकरणात 13 जणांना जिवती पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी घडली.
हेही वाचा - मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
घटनेची माहिती जिवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गावात पोहोचले आणि त्यांनी पीडितांची सुटका केली. यावेळी त्यांना बांधून ठेवण्यात आले होते.
या प्रकारामुळे गावात दहशतीचे वातावरण असल्यामुळे कोणीच काही बोलायला तयार नव्हते. यानंतर रविवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. धनंजय तावाडे आणि अनिल दहागावकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा करत त्यांनी विश्वासात घेतले तेव्हा तेथील प्रत्यक्षदर्शीने 13 जणांची नावे सांगितली. त्यानुसारच एका पीडित महिलेच्या बयानवरून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे.
हेही वाचा - इगतपुरी तालुक्यातील 18 वर्षीय तरुणीने घेतला गळफास; मोबाईलवर गाणे लावून संपवले जीवन