चंद्रपूर - हैदराबाद येथील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच जिल्ह्यातील अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - सफदरजंग रुग्णालयासमोर 'या' कारणामुळे महिलेकडून आपल्या ६ वर्षांच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न
महाऔष्णिक वीज केंद्रात शुक्रवार सकाळच्या सुमारास प्रयोगशाळेतील वरिष्ठ कर्मचारी राजू पवार याने कनिष्ठ महिला कर्मचारी कार्यालयात एकटी असल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. याबाबत पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यासंदर्भात चौकशी केली असता राजू पवार याने विनयभंग केल्याचे समोर आले.
दरम्यान, पीडित महिलेने शनिवारी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून या कर्मचाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता राजू घुगे यांनी दिली. मात्र, कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.