चंद्रपूर- चिमूर तालुक्यातील राखीव वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची तस्करी होत आहे. याला आळा घालण्यासाठी वनविभागाच्या विशेष पथकाची रात्री गस्त वाढवण्यात आली आहे. सोमवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान भीसी ते जांभूळविहिरा रोडवर अवैधरित्या साग झाडांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आले. कारवाईत 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळील सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलांत सागवान झांडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृहोपयोगी वस्तुंकरीता सागाच्या लाकडाची मागणी मोठी आहे. त्यामूळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातुन सागवान झांडाची कत्तल करून रात्री त्यांची वाहतुक करण्यात येते. यावर अंकुश ठेवण्याकरीता वनविकास विभागाचे विशेष पथक रात्रीच्या वेळी गस्त देते. या पथकाद्वारे भिसी-जांभुळविहीरा रोडवर गस्त सुरू असताना रात्री १० वाजताच्या सुमारास संशयास्पद ट्रॅक्टर आढळून आला. ट्रॉलीची तपासणी केली असता अवैध सागाची वाहतुक करीत असल्याचे आढळून आले.
ट्रॅक्टरमध्ये १ लाख रूपये किंमताचे सागाचे 42 नग आणि ट्रॅक्टर असे एकूण 6 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, आरोपी दिनेश वासुदेव दिघोरे (रा. भिसी) व त्याचे इतर 7 सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणात आरोपीवर भारतीय वन अधिनियम तसेच महाराष्ट्र झाड तोडणे अधिनियम 1964 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष पथकाचे प्रमुख वन परिमंडळ अधिकारी रमेश बलैया, क्षेत्र सहाय्यक आशिष बायस्कर, वनरक्षक आर.पी . आगोसे, चव्हाण, घुठे यांनी ही कामगीरी पार पाडली. वनाधिकाऱ्यांनी अटक केलेल्या आरोपींना चिमूर न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
पुढील तपास पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी विवेक मोरे, सहाय्यक व्यवस्थापक सुनील आत्राम तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी ऋतुराज बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे आहेत.