चंद्रपूर - जिल्ह्यातील तब्बल बारा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाबा प्रादेशिक पाणी पूरवठा योजना दोन दिवसापासून ठप्प पडल्याने बारा गावातील नागरिकांची पाण्यासाठी वनवन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी योजना सलग सहा दिवस बंद होती. आता पुन्हा तांत्रिक कारणाने दोन दिवसांपासून गावातील नळ कोरडे पडले आहेत. परिणामी ऐन पावसाळ्यात तब्बल बारा गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
तांत्रिक कारणाने धाबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना गेल्या दोन दिवसापासून बंद पडली आहे. परिणामी, या योजनेत समाविष्ट असलेल्या गावातील नागरिकावर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वन-वन भटकण्याची वेळ आली आहे. पिण्याचा पाण्यासाठी ओस पडलेल्या विहिरीवर महिलांची गर्दी उसळली आहे. धाबा योजनेत समाविष्ट असलेल्या कोंढाणा, बेघर या गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. त्यामुळे गावापासून दोन कि.मी लांब असलेल्या नाल्यावर विहीर खोदून तेथील गढूळ पाण्याने गावकरी तहान भागवत आहे. गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
धाबा योजना ठेकेदारामार्फत चालविली जाते. सबंधित ठेकेदाराचे योजनेकडे कमालीचे दूर्लक्ष झालेले आहे. ठेकेदाराच्या अनेक तक्रारी गावकरी, ग्रामपंचायतीने केलेल्या आहेत. मात्र, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विभागावर संताप व्यक्त केला जात आहे.
धाबा पाणी पुरवठा योजना चालवणाऱ्या ठेकेदाराविरोधात अनेक तक्रारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पडून आहेत. मात्र, अद्यापही नागरिकांच्या तक्रारी विभागाने गांभिर्याने घेतल्या नाहीत. त्यामुळे विभाग सामान्य माणसांची समस्या सोडविण्यासाठी आहे की, ठेकेदाराचा ऐकण्यासाठी असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.