चंद्रपूर - बल्लारपूर येथे ११ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या सुसज्ज आणि भव्य, अशा बस स्थानकाला पहिल्याच पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसात छताचा काही भाग कोसळल्याने पावसाचे पाणी बसस्थानकात गळू लागले आहे.
सुदैवाने, छत कोसळताना तेथे कुणीही प्रवासी नसल्याने जिवितहानी टाळली. मात्र, तीन महिन्यात दोनदा छताचा भाग कोसळल्याने या बांधकामाचा दर्जा किती तकलादू आहे, हे या घटनेतून दिसून आले आहे.
गेल्या ६ मार्चला या बसस्थानकाचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले होते. ११ कोटींच्या निधीतून हे आदर्श बसस्थानक उभारण्यात आले होते. एखाद्या विमानतळाला शोभेल, अशा प्रकारचे हे बसस्थानक आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र, या बसस्थानकाच्या दर्जाचा फोलपणा काही दिवसातच समोर आला. महिन्याभरापूर्वी छताचे पिओपी कोसळून पडले. उन्हाच्या पाऱ्यामुळे ही घटना घडल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. आज झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा येथील छताचा एक भाग कोसळला. नुकतेच तयार केलेले हे बसस्थानक आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. याच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.