चंद्रपूर - शहरातील तुकुम येथे 14 व्यक्ती परदेशी आणि इतर राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता, त्यांनी 14 जणांना ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये 11 जण हे तुर्कस्तान या देशातून आल्याची माहिती आहे. तर केरळ, ओडिसा आणि दिल्ली येथून प्रत्येकी एक जण आल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने कठोर अंमलबाजवणी केली जात आहे. विदेश, इतर जिल्हा, राज्यातून आलेल्यांनी स्वत: माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अनेकांनी ही माहितीच प्रशासनाला दिली नसल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर शहरामध्ये असेच 14 जण राहत होते. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यातील परदेशातून आलेल्या 11 व्यक्तींना शहरातील वन अकादमी येथे होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
या घटनेमुळे काही नागरिकांची अक्षम्य बेजबाबदारी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रशासनाकडून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी आपली माहिती स्वतः प्रशासनाला देण्याचे आवाहन केले असताना या आवाहनाला केराची टोपली दाखविण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.