चंद्रपूर- चंद्रपूर-मूल हा महामार्ग निष्पाप वन्यजीवांच्या मृत्यूचा मार्ग ठरत आहे. या मार्गावर वाहनाच्या धडकेत दुर्मिळ रस्टी स्पोटेड मांजरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री लोहारा गावाजवळ उघडकीस आली.
त्यावेळी पप्पी यादव हे या मार्गावरून घरी परत येत होते, त्यादरम्यान त्यांना ही मांजर मृतावस्थेत आढळली. मृत मांजर रानमांजरापेक्षा वेगळी असल्याने पप्पी यादव यांनी वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांच्याशी संपर्क केला. तेव्हा मांजर रस्टी स्पॉटेड कॅट या दुर्मिळ प्रजातीची असल्याचे समोर आले. दोन वर्षाआधी ऊर्जानगर वसाहतीतसुद्धा रस्टी स्पॉटेड कॅटचा अपघाती मृत्यू झाला होता. चंद्रपूर- मूल महामार्गावर सोमवारी सकाळी एका सांबराचा देखील अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
चंद्रपूर-मूल मार्गाचे विस्तारीकरण करून हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. वन्यजीवांचा हा अधिवास आहे. हा महामार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प लगतच असल्याने हा अनेक वाघांचे भ्रमण मार्गसुद्धा आहे. हा कावल अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला जोडणारा वाघांचा भ्रमण मार्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भविष्यात वन्यजीवांचा अपघातात नाहक बळी जाऊ नये यासाठी वन्यजिवांना सहज ये-जाकरण्यासाठी अंडर पासेस तयार करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली होती. मात्र ती धुडकावण्यात आली. मात्र वन्यजीवांचा अपघाती मृत्यू होत असल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या मार्गावर अनेक वन्यजीवांचा रस्ता ओलांडताना मृत्यू झाला आहे. हा दुर्दैवी घटनाक्रम दिवसेंदिवस वाढत आहे. या रस्त्यावरती वनविभागाद्वारे सूचनाफलक लावण्यात आले असून, 'कृपया वाहने हळू चालवा', 'वन्यप्राणी रस्ता ओलांडत आहे असा इशारा देऊनही या मार्गावर भरधाव वेगाने वाहने चालविली जातात. त्यावर कुणाचेही निर्बंध नाहीत. प्रशासनाचे यावर कुठलेही लक्ष नाही किंवा यावर कुठली कारवाई देखील केली जात नाही. त्यामुळे हा रस्ता आता वन्यजीवांच्या मुळावर उठला आहे.
हेही वाचा- बिबट्याने पाच वर्षीय चिमुकलीला उचलून नेले; मुलीचा मृत्यू