चंद्रपूर - गुन्हेगारीसाठी प्रसिध्द असलेले बल्लारपूर शहर आज पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. चक्क भाच्यानेच मामाचा काटा काढला आहे. यात मामाचा जागीच मृत्यू झाला आहे. राकेश बहुरिया असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. या प्रकरणातील एकाला अटक केली आहे. तर, दुसरा फरार आहे. या खुनाचा संबंध अवैध दारूच्या व्यवसायाशी जोडला जात आहे.
दारूच्या व्यवसायातून वाद
बल्लारपूर शहरात गुन्हेगारीच्या घटना नेहमी घडत आहेत. रविवारी (30 मे) रात्री आणखी एक खून झाला, ज्याने संपूर्ण शहर पुन्हा एकदा हादरून गेले आहे. बल्लारपूर येथील आंबेडकर वॉर्डमधे राकेश बहुरिया आणि त्याचा भाचा राजकुमार बहुरिया हे दोघेही राहतात. राकेश हा दारू विक्रीचा व्यवसाय करायचा. तर राजकुमारने काही महिन्यांपूर्वी या धंद्यात प्रवेश केला. त्यामुळे मामा आणि राजकुमार यांच्यात वाद निर्माण झाले. या दारूच्या धंद्यावरून त्यांचे अनेकदा भांडणही झाले.
दुचाकी चालवतानाच चिरला मामाचा गळा
काल राजकुमार आणि त्याचा भाऊ सुरज यांनी आपल्या मामाची हत्या करण्याचा कट रचला. काल सायंकाळी राकेश बहुरिया दुचाकी चालवत असताना आरोपींनी थेट राकेशचा गळा तलवारीने चिरला. यात राकेशचा जागीच मृत्यू झाला.
एकाला अटक, दुसरा फरार
या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर एक फरार झाला आहे. याबाबत बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, यापूर्वीही येथे सुरज बहुरिया नावाच्या व्यक्तीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला अवैध कोळसा तस्करीची किनार होती. त्यानंतर आता राकेश बहुरियाचा खून करण्यात आला आहे.
हेही वाचा - कंगनाच्या बॉडीगार्डला अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटक