चंद्रपूर - काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा आज दुपारी चंद्रपुरात आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ च्या सुमारास ते येथे येण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या सभेत राहुल गांधी कोणते मुद्दे उपस्थित करणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष आहे.
काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी येथे येणार आहे. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे आक्रमक पवित्र्यात दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते थेट टीकास्त्र सोडत आहेत. आमची सत्ता आली तर सर्वप्रथम आम्ही राफेलची चौकशी करू, गरिबांना वर्षाचे ७२ हजार रुपये देऊ, चौकीदाराला जेलमध्ये टाकू अशा घोषणा त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सभेत राहुल गांधी कुठले मुद्दे उपस्थित करतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.