चंद्रपूर - वेकोलीच्या क्रूर थट्टेमुळे घरी सासूरवास सुरू झाला आणि या जाचामुळे माहेरी परत आलेल्या दोन महिलांना आमरण उपोषणावर बसण्याची पाळी आली आहे. कदाचित हे कारण विचित्र वाटत असेल मात्र त्याला वेकोली कोळसा खाणीचे व्यवस्थापन जबाबदार आहे. वेकोलीच्या खाणीत जमिन जाईल आणि त्यातून मिळालेल्या नोकरीतुन संसार थाटू, हे सांगून दोन मुलींचे लग्न लावून देण्यात आले. मात्र, वेकोलीने ही जमीनच अधिग्रहित केली नाही. आज सहा वर्षे लोटली. सासरच्यांनी नोकरी कधी मिळेल, हा तगादा लावला आणि या जाचाला कंटाळून दोन महिलांना आपल्या माहेरी परतावे लागले. आज या दोन महिला वेकोलीच्या विरोधात आमरण उपोषणाला बसल्या आहेत.
मात्र, वेकोली व्यवस्थापनाच्या मनात वेगळेच खलबत शिजत होते. मध्यभागी असलेल्या या 11 एकर शेतीला सोडून वेकोलीने उर्वरित 21 एकर शेती अधिग्रहित केली. यामुळे सर्वांना धक्काच बसला. मात्र, वेकोलीने हात झटकले. ही शेती तुमची नाही, यावर आपला कुठलाही अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी सर्व मागण्या फेटाळून लावल्या. जेव्हा की या क्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी शेतीची पाहणी करून ही जमीन त्यांचीच असल्याचा शेरा दिला आहे. मात्र, वेकोलीचे मुजोर व्यवस्थापन प्रशासनाला देखील जुमानले नाही. 2015 पासून हा संघर्ष सुरू आहे. ज्यांनी आपल्याला नोकरी मिळेल म्हणून लग्न केले. त्यांनी आपल्या पत्नीला जाब विचारायला सुरुवात केली. या मुलींच्या सासरकडून देखील टोमणे मारायला सुरुवात झाली. या जाचाला कंटाळून मुलींवर माहेरी राहण्याची वेळ आली आहे. गेल्या सात दिवसांपासून या महिला आमरण उपोषणाला बसल्या आहेत.
शेतीचीही कोंडी -
2015 पासून हे प्रकरण सुरू आहे. मात्र, वेकोलीने उलट या शेतकऱ्यांवर सूड उगवायला सुरुवात केली आहे. या शेतीच्या सभोवताली वेकोलीने उपसा केलेले सर्व मातीचे ढिगारे येथे उभारण्यात आले. शेतीकडे जाणारा रस्ता खोदून टाकला, पांदणरस्ता बंद केला. त्यामुळे आजवर जे शेतीतून उत्पादन मिळत होते. ते देखील बंद झाले.
वेकोलीचे व्यवस्थापन की इंग्रजांचे?
वेकोलीचे व्यवस्थापन शेतकऱ्यांशी सूडबुद्धीने वागत आहे. त्यामुळे हे वेकोलीचे व्यवस्थापन आहे, की इंग्रजांचे असा सवाल हे शेतकरी विचारत आहेत. शेतकऱ्यांना म्हणण्यानुसार जमीन अधिग्रहित करण्याचा तोडगा निघणार नाही, म्हणून न्यायालयात दाद मागण्याची सूचना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत खुद्द वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, कुठलाही तोडगा काढण्याऐवजी वेकोलीचे प्रकरण न्यायालयात असल्याची सबब व्यवस्थापन देत आहेत. या शेतकऱ्यांची 11 एकर जमीन का घेतली नाही, याचे कुठलेही उत्तर येथील क्षेत्रीय महाप्रबंधक यांच्याकडे नाही. 11 एकर जमिनीचे चार मालक आहेत. त्यातील दोन हे खुद्द वेकोलीचे कर्मचारी आहेत. आपल्या मुलांच्या नावाने त्यांनी ही जमीन विकत घेतली. मात्र, आता त्याचा हक्क मिळण्यासाठी ते दाद मागायला लागले तर सूडबुद्धीने त्यांची इतर राज्यात बदली करण्यात आली. जर तिथे रुजू झाले नाही. तर बडतर्फ करू, असे धमकीवजा पत्रही त्यांना पाठविण्यात आले. ज्यांची हक्काची जमीन आहे. त्या सामान्य शेतकऱ्यांना जर असा संघर्ष करावा लागत असेल. तर ते दुर्दैवी आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे लक्ष घालून तोडगा काढणे आवश्यक झाले आहे.
भूमिपुत्रांच्या न्यायासाठी शिवसेना मैदानात -
या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम शिवसेनाप्रणित कंत्राटी कर्मचारी सेनेने केले. संघटनेचे पदाधिकारी यांनी वेकोली खाणीचे व्यवस्थापक यांची भेट घेतली. त्यावर तोडगा न निघाल्याने ते नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयात धडकले. मात्र, वेकोली अधिकाऱ्यांची मुजोरी कायम असल्याने आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला. सामान्य मराठी माणसाला जर वेकोली न्याय देत नसेल तर आम्ही आमच्या भाषेत त्यांना उत्तर देऊ. हा अन्याय कदापी खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे, सचिव अमोल मेश्राम यांनी दिला आहे.