चंद्रपूर - जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नसला तरी शासकीय संकेत स्थळावर दोन रुग्ण दाखविण्यात येत होते. यामुळे नागरिकांत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. हे रुग्ण नागपुरात सापडले असले तरी त्यांचे आधारकार्ड चंद्रपुरचे असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्ह्यात टाकण्यात आले होते. अखेर हे रुग्णदेखील आता कोरोनामुक्त झाले असून चंद्रपूरबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.
चंद्रपूर येथील ३९ वर्षीय पती आणि ३२ वर्षीय पत्नी असे दोघेही इंडोनेशियाहून दिल्ली मार्गे नागपुरात आले होते. मागील सहा महिन्यांत ते कधीही चंद्रपूर जिल्ह्यात आले नाहीत. दोघांनाही प्रशासनाने खबरदारी म्हणून विलगीकरणात ठेवले. ६ एप्रिलला पतीला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करून त्यांच्या पत्नीचीही तपासणी करण्यात आली. तिलाही कोरोना असल्याचे स्पष्ट झाले.
नागपुरात आढळले असले तरी ते मूळ चंद्रपूरचे असल्याने शासकीय आकडेवारीत याची नोंद चंद्रपूर म्हणूनच झाली. हीच आकडेवारी प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि नागरिकांत गोंधळ उडाला. चंद्रपूर जिल्ह्यातच कुठे रुग्ण आढळले असावे, असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात येत होता. यामुळेच चंद्रपूर जिल्हा हा ऑरेंज क्षेत्रात गेल्याचेही दाखवत होते. अखेर या संभ्रमावर आता पडदा पडला आहे. कारण मूळ चंद्रपूर येथील दाम्पत्य आता कोरोनापासून मुक्त झाले आहे आणि पर्यायाने चंद्रपूर जिल्हा या संभ्रमातुन दूर गेला आहे.