चंद्रपूर - चंद्रपूर शहराने या वर्षी उष्णतेचा 122 वर्षांचा उच्चांक मोडला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात मागील शंभर वर्षांचा उच्चांक होता. तो यावर्षी पार झाला आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत चंद्रपूरचे तापमान हे तब्बल 49 डिग्रीपर्यंत जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मात्र जे चंद्रपुरात घडतंय ते साऱ्या जगात घडतंय. हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. आपण त्याकडे आता गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढीचा ( Global Warming ) थेट संबंध हा अर्थकारणाशी आहे. सरकारने धोरणात्मक पातळीवर यावर ऍक्शन प्लान तयार करणे आवश्यक आहे. अन्यथा फार काळ नाही, अवघ्या पाच ते दहा वर्षांतच आपल्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि यामुळे आपले जगणे मुश्किल होईल, अशी चिंता ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे.
अर्थकारण आणि ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध - लोकसंख्या वाढ हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अघोरी वापर सुरू आहे. जंगले कमी होत आहेत. ऊर्जा उत्पादनासाठी कोळशाचा मोठा वापर केला जात आहे. जशी जशी लोकसंख्या वाढत आहेत तशी झपाट्याने नैसर्गिक संपत्ती नष्ट होत आहे. जंगले कमी होत आहे. खाण्यापिण्याचे स्रोत वाढविण्याचा दबाव आहे. कार्बनचे उत्सर्जन वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमानात चिंताजनक वाढ होत आहे. नैसर्गिक चक्र बदलले आहे. अति उष्णता, अति पाऊस यामुळे सगळे नैसर्गिक चक्र विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम थेट अर्थकारणावर होत आहे. ज्या ठिकाणी अतिउष्णता किंवा अति पाऊस आहे, तिथल्या नागरिकांच्या सर्व जीवनमानात बदल होईल, रोजगार कमी होईल, साधनसामग्री कमी होईल. ग्लोबल वॉर्मिंगमूळे देशाच्या अर्थकारणावर याचा थेट परिणाम होत जाईल. ही ग्लोबल वॉर्मिंग नागरिकांच्या जीडीपीशी संबंधित आहे. ही बाब अर्थशास्त्राच्या विषयात सामील करण्याची आता निर्णायक वेळ आली आहे, असे प्रा. चोपणे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.
ग्लोबल वॉर्मिंगवर सरकारने ऍक्शन प्लान तयार करण्याची गरज - ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी सरकार पातळीवर ऍक्शन प्लान तयार करण्याची नितांत गरज आहे. ज्या पद्धतीने उष्णता वाढत आहे याचा परिणाम हवामानावर, पर्यावरणावर होत आहे. जिवितांना देखील याची बाधा होणार आहे. जर यासाठी धोरणात्मक पातळीवर 'हीट मिटीगेशन प्लान' जर त्वरित लागू केला तर आपण आपल्या बऱ्याच समस्या दूर करू शकू, या ग्लोबल वॉर्मिंगवर उपाय म्हणून मोठ्या आणि व्यापक पातळीवर आपल्याला वृक्षारोपण करावे लागेल, याबाबत आपण शासनाला पत्र पाठविले असल्याचे प्रा. चोपणे म्हणाले.
चंद्रपुरच्या तापमानाने 122 वर्षांचा उच्चांक मोडला - चंद्रपूरचे तापमान दिवसागणिक उष्णतेचे उच्चांक मोडीत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात आजवरच्या 122 वर्षाच्या इतिहासात सर्वाधिक तापमान होते. मे महिन्याच्या शेवटी उष्णतेच्या दोन लाटा देखील येणार आहे, त्यामुळे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे 49 डिग्रीपर्यंत चंद्रपूरचे तापमान जाण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, असे प्रा. चोपणे यांनी सांगितले. 2010 पासून तापमानवाढीची शृंखला सुरू झाली आहे, जी दरवर्षी उष्णतेचे रेकॉर्ड मोडत आहे. हे चिंताजनक असल्याचे प्रा. चोपणे यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.