चंद्रपूर - आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्याने सर्वत्र खळबळ माजली. त्या बाबा आमटे यांच्या नात तर डॉ. विकास आमटे यांची कन्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमटे कुटुंबीयांमध्ये गृहकलहाच्या चर्चा समोर येत होत्या. काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावर आनंदवनातील एकूण कार्यपद्धतीवर काही वक्तव्य केली होती. मात्र, काही वेळात तो मजकूर हटवण्यात आला. यावर आमटे परिवाराने 22 नोव्हेंबरला प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टीकरण दिले. शीतल या नैराश्याने ग्रस्त असून त्यातूनच हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात आले. यानंतर संबंधित प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले.
डॉ. शीतल आमटे मागील काही दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त होत्या. त्यांनी महारोगी सेवा समितीची सूत्रे हाती घेतल्यावर अनेक बदल झालेत. त्यातून वाद देखील निर्माण झाला होता. हा वाद हळूहळू वाढत गेला. याच दरम्यान शीतल आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या एकूण कारभाराबाबत काही वक्तव्ये देखील केली होती. त्यांनी ही सोशल मीडियावर टाकली. यावर 22 नोव्हेंबरला आमटे कुटुंबाने प्रसिद्धीपत्रक काढले होते.
यात डॉ. विकास आमटे, त्यांच्या पत्नी डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. यात महारोगी सेवा समितीबाबत डॉ. शीतल आमटे यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांबाबत खुलासा करण्यात आला होता. हे सर्व आरोप त्यात फेटाळून लावण्यात आले. संस्थेचे कार्य, विश्वस्त आणि कार्यकर्त्यांबाबत केलेले वक्तव्य हे निराधार असल्याचे सांगण्यात आले. शीतल आमटे यांच्या निवेदनामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये. आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करत आहे, असे सांगण्यात आले. समाजाने कोणताही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे जाहीर झाले. त्यामुळे डॉ. शीतल आमटे आणि आमटे परिवारातील इतर सदस्यांत मतभेद असल्याचे समोर आले.