चंद्रपूर - तब्बल महिनाभरानंतरही आनंदवनच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत पोलीस तपासात अल्प प्रगती दिसत आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत डॉ. शीतल यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष उघड करण्यात आला.
विविध अहवाल प्रतीक्षेत
व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत राखून ठेवल्याची माहिती देण्यात आली. डॉ. शीतल यांचा मृत्यू घातपात नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. याआधी जून 2020मध्ये डॉ. शीतल यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी नवी अधिकृत माहिती पोलिसांनी दिली असून, घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. डॉ. शीतल यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाचा खुलासा करू शकणारे त्यांचे टॅब-मोबाईल-लॅपटॉप यांचा मुंबई प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अल्सर झालेल्या डॉ. शीतल यांच्या पाळीव कुत्र्यांना संपवण्यासाठी त्यांनी 3 प्रकारचे इंजेक्शन बोलावले होते. त्यातील एक रिकामे अँपुल मिळाल्याचा खुलासा चौकशीदरम्यान झाला आहे. मृत्यूसंदर्भातील विविध अहवाल प्रतीक्षेत असल्याने मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्या काही दिवसांपासून मानसिक ताणात होत्या. यासाठी त्यांच्यावर उपचार करणारे मानसोपचार तज्ज्ञ या दृष्टीनेही तपास करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
'तो' व्हिडिओ पोलिसांना मिळालाच नाही
मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी शीतल आमटे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. ज्यात त्यांनी आमटे परिवारातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. जवळपास 20 ते 25 मिनिटांच्या व्हिडिओ त्यांनी आपबीती कथन केली. यात त्या त्या सातत्याने रडत आहेत. हा व्हिडिओ त्यांनी काहीवेळाने डिलीट केला होता. मात्र, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या व्हिडिओत करण्यात आलेले आरोप आणि झालेली आत्महत्या या दृष्टीने पोलिसांनी तपास केला आहे का, याची विचारणा केली असता पोलीस अधीक्षक साळवे यांनी असा व्हिडिओ अजून पोलीस विभागाच्या हाती लागला नाही, असे स्पष्ट केले.
चित्रीकरण करण्यास बंदी
पत्रपरिषदेत प्रथमच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कॅमेऱ्यांना पहिल्या काही मिनिटानंतर चित्रिकरणास बंदी घालण्यात आली. पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक माहिती देत असताना इलेक्ट्रॉनिक मीडियाला कुठलेही चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला. आपण जेव्हा कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देऊ त्याच वेळी चित्रीकरण करा, अशी सूचना यावेळी देण्यात आली.