चंद्रपूर - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी दोन आठवडे महत्वपूर्ण असून आवश्यकता असेल, तरच सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 31 तारखेपर्यंत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच गरज पडल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा,असे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र पुढचे दोन आठवडे प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
काही ठिकाणी बंदीचे आदेश दिल्यानंतरही कोचिंग क्लासेस सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच जीवनावश्यक वस्तू शिवाय पुढील काळामध्ये सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद करण्यात यावे, असे निर्देश देखील देण्यात आले आहे.
आठ विदेशी नागरिक निरीक्षणाखाली
जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार कालपासून आठ विदेशी नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सौदी अरेबिया मधील दोन, दुबईचे पाच व अमेरिकेतील आलेल्या एका नागरिकाचा यामध्ये समावेश आहे.
'आनंदवन' बंद
वरोरा येथील आनंदवन देखील आता अभ्यासकांसाठी व बाहेरील व्यक्तींसाठी बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यांनी देखील ही बाब लक्षात घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विविध यात्रा रद्द
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रसिद्ध महाकाली यात्रा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे, जिवती तालुक्यातील मराई पाटण गंगा मातेची यात्रा सुरू होती. याठिकाणी विविध राज्यातील व जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने भाविक येतात. महिनाभर चालणारी ही यात्रा 16 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थगित करण्यात आली आहे.
जिल्ह्यात धार्मिक स्थळे बंद
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अंतर्गत जिल्ह्यातील गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व देवस्थान,धार्मिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत.
तहसील पातळीवर 'कॉरेंटाईन केंद्र'
प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये 'कॉरेंटाईन' करण्यात येणार आहे.