चंद्रपूर - जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बहुतांशी ठिकाणी जमावबंदी लागू आहे. याचा फटका पूर्वनियोजित लग्न समारंभांना बसला आहे. काही सुज्ञ आणि कर्तव्यदक्ष नागरिक आपले समारंभ रद्द करुन शासनाला सहकार्य करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेही असाच सुज्ञपणा दर्शवत काही दिवसांवर येऊन ठेपलेला आपला लग्न सोहळा पुढे ढकलला आहे. हेमराज किसन गुरनुले असे या पोलीसाचे नाव आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. गोंडपिंपरी तालूक्यातील धाबा उप पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेमराज किसन गुरनुले यांनी आपल्या लग्नाला स्थगिती दिली आहे.
हेही वाचा - कोरोना विशेष: भारत तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर.. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती
हेमराज यांचे फिस्कूटी गावातील पायल राघोजी कावडे यांच्याशी लग्न २९ मार्चला लग्न होणार होते. दोन्ही कुटुबांनी लग्नाची जय्यत तयारी केली होती. निमंत्रण पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना विषाणूचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दोन्ही कुटुबांनी लग्न सोहळा काही काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.