चंद्रपूर - महाराष्ट्र आणि तेलंगाणा या दोन राज्यांना जोडणारा बहुप्रतीक्षित पोडसा पुलाची निर्मिती महाराष्ट्र-तेलंगाणा सरकारने केली होती. मात्र, हा पूल पहिल्याच पावसात क्षतिग्रस्त झाला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरुन होणाऱ्या जड वाहतुकीवर बंदी घातली आहे. दहा वर्षांपासून हा पूल शोभेची वास्तू ठरला आहे.
या पोडसा पुलाची निर्मिती जिल्ह्यातील पोडसा गावालगत असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात करण्यात आली. वर्धा नदीला आलेल्या पहिल्या पुरात पोडसा पूल क्षतिग्रस्त झाला. पुलाचा एक स्लॅब दबला गेला. कोटी रुपये खर्चून उभा झालेल्या पुलाच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित केले गेले. स्थानिक नेत्यांनी सतत चौकशीची मागणी केली. मात्र, कोणतीही चौकशी झाली नाही. तर पुलाच्या दुरस्तीचे काम मागील उन्हाळ्यात सुरू झाले. मात्र, हे काम अतिशय संतगतीने सुरू आहे. तर पावसाळा सुरू होताच काम बंद करण्यात आले.
हेही वाचा - आमदारांचे मत विचारात घेऊनच पुढील निर्णय - नवाब मलिक
पुल क्षतिग्रस्त असल्याने बांधकाम विभागाने पुलावरुन जड वाहतूकीला बंदी घातली आहे. दुचाकी, चारचाकी लहान वाहनांची वर्दळ या पुलावरुन सुरू आहे. तसेच बससेवा अद्यापही सुरू झालेली नाही. खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. म्हणून शोभेची वस्तू ठरलेल्या या पुलाच्या कामाला त्वरित सुरुवात करण्याची मागणी आता पुढे येत आहे.