चिमूर (चंद्रपूर) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणीकरिता प्रधानमंत्री गरीब किसान योजनेची घोषणा करण्यात आली. चिमूर तालुक्यातही या योजनेअंतर्गत अन्नपुरवठा तथा वितरण विभागाकडून २१ स्वस्त धान्य दुकानातून वितरण सुरू करण्यात आले असून, धान्य उपलब्धतेनुसार संपूर्ण तालुक्यात याचे वितरण करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अन्न-धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, विभागाच्या निर्देशाप्रमाणे सर्वप्रथम माहे एप्रिल, मे आणि जून 2020साठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दिलेल्या अन्न धान्याचे त्या महिन्यात वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर तांदळाचे लाभार्थ्यांना वितरण होईल.
प्रति सदस्य ५ किलो तांदुळ देण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी, प्राधान्य कुटुंब लाभार्थी कुटुंबांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या धान्यांचा नियमित वितरण करण्यात येईल. चिमूर तालुक्यात एकूण १४१ स्वस्त धान्य दुकान असून, त्यापैकी ३० दुकानात धान्यांचे वितरण सुरू झाले आहे. उर्वरीत दुकानात त्वरीत वितरण करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता कोणीही स्वस्त धान्य दुकानात गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंग ठेऊन संबंधित दुकानदाराला सहकार्य करावे, असे आवाहान अन्न पुरवठा आणि वितरण अधिकारी आशिष फुलके यांनी तालुक्यातील लाभार्थ्यांना केले आहे.