चंद्रपुर - शहरातील मूल परिसरात गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांनी विश्राम गृह मार्गावर घागरी ठेऊन चक्का जाम आंदोलन केले. यावेळी तेथे आलेल्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे तसेच मुख्याधिकारी विजय सरनाईक यांना घेराव घालून नागरिकांनी रोष व्यक्त केला.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूल भागासाठी 24 तास पाणी पुरवठ्याची योजना राबवली होती. यासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करण्यात आली. सध्या नवीन आणि जुने जलकुंभ मिळून नगर पालिकेतर्फे पाणी पुरवठा करण्यात येतो.
हेही वाचा लातूरकरांच्या पाण्यासाठीच लढणार - राजा मणियार
परंतु, गेल्या बारा दिवसांपासून शहरातील अर्ध्या भागाचा पाणी पुरवठा बंद आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर घागरी ठेऊन चक्काजाम केला. पाणीपुरवठा करण्यात तांत्रिक अडचण येत असल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, बारा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला.