पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू आहे. या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उबाठा खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात भेट दिली. यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा रेटा आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
विधानसभा निवडणुकांवर चिंतन करण्याची गरज नाही : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. तर महायुतीनं जोरदार मुसंडी मारत विधानसभेत मोठं यश मिळवलं. मात्र याबाबत बोलताना संजय राऊत यांनी मोठा हल्लाबोल केला. "आम्हाला नागरिकांनी भरभरुन मतदान केलं, मात्र ते आम्हाला मिळालं नाही, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे पुन्हा मतदान घ्या, अशी आमची मागणी आहे" असं त्यांनी सांगितलं.
स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याचा कार्यकर्त्यांचा रेटा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी आता सगळ्याच पक्षांनी सुरू केली आहे. संजय राऊत यांनीही आज पुण्यात येऊन आढावा घेतला आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, की "आम्ही भाजपासोबत होतो, तेव्हाही स्वबळाच्या चर्चा सुरू होत्या. आमची महाविकास आघाडी अद्यापही अस्तित्वात आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा रेटा आहे," असं त्यांनी सांगितलं. "कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे. स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा रेटा आहे. त्यामुळे आम्ही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार करत आहोत. तर इतर ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा विचारही करत आहोत," असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितंल. संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं सुतोवाच केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा :