चंद्रपूर - आजची मुलं ही उद्याचे भविष्य आहे. जर मुलं निरोगी आणि सुदृढ तर देशाचे भविष्य उज्ज्वल, मात्र जिल्ह्यातील लहान मुलांचे विदारक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्यांपैकी केवळ दहा टक्केच अंगणवाड्यांमध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण 2121 अंगणवाड्या आहेत, त्यापैकी फक्त 203 अंगणवाड्यात नळ जोडणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांचेही हेच वास्तव आहे. एकूण 1669 पैकी 803 शाळांत पाणी पिण्याचे नळ उपलब्ध आहेत.
शिक्षणाचे पहिले वळण हे मुलांना अंगणवाडीत लागते. त्यामुळे अंगणवाडीत सर्व सोयीसुविधा आवश्यक आहेत. मात्र, दुर्दैवाने येथे अनेक सुविधांची वानवा दिसून येते. त्यात पाण्याचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, अपवाद वगळता बहुतेक सर्वच अंगणवाडी स्वच्छ पिण्याचे पाणी म्हणून नळ उपलब्ध नाही. कारण त्या गावात नळ योजनाच नाही. तब्बल 90 टक्के अंगणवाड्यांत हीच समस्या आहे. पिण्याची पूर्तता हातपंप किंवा बाहेरून आणलेल्या पाण्याने करावी लागते, हे पाणी पिण्यास योग्य आहे का याचीही शाश्वती नाही. असे पाणी प्राशन केल्यास अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यावर मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.जिल्ह्यात एकूण 2121 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी केवळ 203 अंगणवाड्यांतच नळ आहेत. यात बल्लारपूर तालुक्यात 72 पैकी 21, भद्रावती 142 पैकी 27, ब्रह्मपुरी 198 पैकी 19, चंद्रपूर 196 पैकी 6, चिमूर 225 पैकी 1, गोंडपिपरी 122 पैकी 0, जिवती 81 पैकी 0, कोरपना 153 पैकी 4, मूल 141 पैकी 35, नागभीड 164 पैकी 23, पोंभुर्णा 82 पैकी 9, राजुरा 179 पैकी 35, सावली 102 पैकी 0, सिंदेवाही 125 पैकी 0, वरोरा 139 पैकी 23 अंगणवाड्यांत पिण्याचा नळ आहे. यामध्ये गोंडपिपरी, जिवती, सावली आणि सिंदेवाही तालुक्यात तर एकाही अंगणवाडीमध्ये नळ नाही. चंद्रपूरसारख्या शहरीकरण झालेल्या तालुक्यातही केवळ 6 ठिकाणी नळ आहेत. चिमूरमध्ये 1, कोरपनात 4 आणि पोंभुरणा येथे 9 जागीच नळ आहे. एकूणच ही परिस्थिती दुर्दैवी आणि चिंतनीय अशीच आहे.
काय आहे जल जीवन मिशन
जल जीवन मिशन ही केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे. ज्यामध्ये प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना आणि प्रत्येक घरात नळ अशी संकल्पना आहे. यात प्रत्येक शाळा आणि अंगणवाडी जोडली जाणार आहे. 2024 पर्यंत हे उद्दिष्ट गाठायचे आहे. हे उद्दिष्ट गाठायला चंद्रपूर जिल्हा परिषदेला शर्थीचे प्रयत्न करणे गरजेचे आहेत.