राजूरा (चंद्रपूर)- घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने हात साफ केल्याची घटना तालुक्यातील वडकुली येथे घडली. चोरांनी घरातून 5 हजार रोख रकमेसह अंदाजे 45 हजार रुपयांचे सोने चोरून नेले आहे. या प्रकरणाचा तात्काळ तपास करून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. संतोष आत्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वडकुली येथील सीताबाई हिंगणे यांच्या घरी शुक्रवारी ही चोरी झाली होती. सीताबाई हिंगाणे या शुक्रवारी सकाळी शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी घरी परतल्या असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले.
घराच्या आत गेल्यानंतर आतील कपाट फुटलेल्या अवस्थेत आढळले. यावेळी कपाटातील 15 ग्रॅम सोन्याचा गोप व पाच हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी सीताबाई यांनी गोंडपिपरी पोलिसांना माहिती दिली. यावर ठाणेदार संदीप धोबे यांनी तातडीने तपासाची चक्र फिरविली. यावेळी वडकुली येथील संतोष आत्राम याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सोन्याचा गोप व चार हजार रुपये जप्त करण्यात आले. एक हजार रुपये चोरट्याने खर्च केले. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.