चंद्रपूर - कोव्हीड-19 रुग्ण असलेल्या गृह अलगीकरणाच्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून १४ दिवसापर्यत दर्शनी भागात फलक लावणे बंधकारक आहे. जेणेकरून सदर ठिकाणी नागरिकांचा संपर्क येणार नाही व कोरोनाचा फैलाव रोखता येईल. पण काही ठिकाणी गृह अलगीकरणातील रूग्णांकडून सदर फलक काढून टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने अशा ठिकाणी संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी कोरोना टास्क समितीला दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आज कोरोना टास्क समितीची बैठक जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आरटीपीसीआर चे प्रभारी राजेंद्र सुरपाम, जिल्हा लसीकरण अधिकारी संदिप गेडाम, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
नवीन लसीकरण केंद्र सुरू
त्यानंतर २३ नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला निर्देशीत केले. दररोजचे कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट १५०० पर्यंत वाढविण्याचेही त्यांनी सांगितले. सध्या उन्हाचे दिवस असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. कोरोना तपासणीसाठी जिल्ह्यातील सर्व आर.टी.पी.सी.आर. केंद्र देखील लवकर बंद न करता सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे त्यांनी सांगितले. प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व नागरिकांची ॲन्टिजन टेस्टींग करण्यासोबतच सुपरस्प्रेडर, आठवडी बाजार, शाळा, आश्रमशाळा व वसतीगृहात नियमित कोरोना तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
हेही वाचा - मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३६ दिवसात ४२९ दिवसांनी घसरला
लसीकरण शंभर टक्कयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट
जिल्ह्यात आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त व ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू असून या सर्वांचे लसीकरण २५ एप्रिल पर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्याकरता नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले. सध्या ६९ केंद्रावर कोरोना लस देण्यात येत असून आतापर्यंत ६४ हजार ३६० डोस देण्यात आले आहेत. यात २० मार्चपर्यंत २४ हजार डोस लस साठा नव्याने प्राप्त होणार आहे. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी ३५० बेडचे शासकीय महिला रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करणे, तसेच लिक्वीड ऑक्सीजन आणि औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याची खबरदारी घेण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सूचित केले. खाजगी दवाखान्यात आणि हॉटेलमध्ये कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध होऊ शकतील का याबाबतही त्यांनी आढावा घेतला. उपचारासाठी नागरिकांसाठी जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, वनिता गर्गेलवार व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - राहुल गांधी आजपासून आसाम दौऱ्यावर; दोन दिवस करणार प्रचार