चंद्रपूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या कार्यक्रमातून परतलेला एक व्यक्ती राजुरा शहरात सापडला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याचे थुंकीचे (स्वॅबचे) नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा- सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात, शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन
तो व्यक्ती मुळचा तेलंगणा येथील आसिफाबाद येथील असून राजुरा येथे त्याची सासुरवाडी आहे. 18 मार्चला हा व्यक्ती बल्लारपूर रेल्वे स्थानकावर उतरुन राजुरा येथे आला होता. येथून तो आपल्या नातेवाईकासोबत आसिफाबाद येथे लग्नासाठी गेला. या लग्नाचे रिसेप्शन राजुऱ्यात असल्याने तो राजुऱ्यात आला होता. मात्र, कोनाच्या भीतीने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
याच दरम्यान जनता कर्फ्यू लागला, त्यानंतर राज्यात जमावबंदी करण्यात आली. संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे हा व्यक्ती येथेच अडकला. आपल्या सासरी तो राहत होता. याबाबत पोलिसांना कसलीही माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान, आशा कामगार घरोघरी जाऊन सर्व्हे करीत असताना, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या व्यक्तीला त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्याच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून याचा अहवाल गुरुवारी प्राप्त होणार आहे. जमातच्या कार्यक्रमात कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याने ह्या रुग्णाच्या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.