राजूरा (चंद्रपूर) - राज्यासह जिल्ह्याबाहेरून आलेल्या १२ व्यक्तींना गोंडपिपरी तालुका प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. गोंडपिपरी शहरातील आदिवासी वसतिगृहात या क्वारंटाईन व्यक्तींची काळजी घेतली जात आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी देखील तालुका प्रशासनावर आहे. असे असतानाही पुरेसे भोजन मिळत नसल्याने या क्वारंटाईन व्यक्तींनी चक्क मिळालेले भोजन न घेण्याचा सामूहिक निर्णय घेतला.
यावरून गोंडपिपरी तालुका प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. ही गंभीर बाब समजताच सामाजिक कार्यकर्ते सूरज माडूरवार यांनी या संबंधिची माहिती आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी आणि गोंडपिपरीच्या तहसीलदार सीमा गजबिये यांना सांगितली. आमदार सुभाष धोटे यांनी पुढाकार घेत तातडीने ही समस्या सोडविण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर दुपारी त्यांची भोजनची व्यवस्था करण्यात आली.
गोंडपिपरीसह परिसरातील व्यक्ती आपापल्या कामानिमित्त पुणे, नागपूर आणि हेद्राबादला गेले होते. अश्यातच लॉकडाऊन सुरू झाले. तरीही त्यांनी आपले गाव गाठले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने तांना तालुका प्रशासनाने गोंडपिंपरीत क्वारंटाईन करून ठेवले आहे. या सर्वांच्या भोजनासह इतरही बाबीची जबाबदारी ही तालुका प्रशासनाची आहे. असे, असताना त्यांना केवळ स्थानिक गोंडपिपरीतील शिवभोजनाची थाळी पुरविल्या जात असल्याचा प्रकार समोर आला.