चंद्रपूर - तालुक्यात भंगाराम तळोधी येथील गावालगत असलेल्या विहिरीत एका एकोणीस वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळला. रविवारी (दि. 21 जून) सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. टाळेबंदीच्या पाच दिवसांपूर्वी तिचा विवाह झाला होता. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रुचिता चिट्टावार (वय 19 वर्षे), असे त्या मृत नवविवाहितेचे नाव आहे.
रुचिता ही आपल्या पतीसह चंद्रपूर येथे वास्तव्यास होती. चार दिवसांपूर्वी रुचिता ही भंगाराम तळोधी येथे आली होती. काल (रविवारी) सायंकाळच्या सुमारास ती घराबाहेर पडली. पण, बराच वेळेपर्यंत घरी परतली नाही. यामुळे नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. गावालगत असलेल्या विहिरीजवळ तिची चप्पल आढळल्या. त्यामुळे याबाबत गोंडपिपरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रुचिताचा मृतदेह आढळला.
यामुळे कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. टाळेबंदीच्या काही दिवसांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. रुचिताचा मृतदेह विहिरीत आढळल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत. या घटनेचा तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पटले करीत आहेत.
शवविच्छेदनास विलंब
रुचिताचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. यानंतर तिचा मृतदेह गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. पण, यावेळी वैद्यकीय अधीक्षक उपस्थित नव्हते. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याने दुसऱ्या डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास असर्थता दर्शवली. यामुळे तिचे शव रात्री उशिरा चंद्रपुरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
हेही वाचा - चंद्रपूर : अखेर काँग्रेसच्या सचिन कत्यालवर गुन्हा दाखल, वाळू तस्करी प्रकरण