चंद्रपूर : तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा पिंपळनेरी-खापरी मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चंद्रपुरात उपचारादरम्यान वडीलांनी प्राण सोडला. अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी चंद्रपूरात हलविण्यात आले. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली.
सायत्रा मोतीराम मेश्राम (६५), कमल चुनारकर (४५) , मोतीराम मेश्राम (७०) अशी मृतांची नावे आहेत. जिल्ह्यातील खापरी धर्मू येथील मेश्राम आणि चुनारकर कुटुंबीय चारचाकी वाहनाने सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. पिंपळनेरी -खापरी मार्गावरील उमरी फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, ते उलटले. या भीषण अपघातात सायत्रा मोतीराम मेश्राम, कमल चूनारकर या मायलेकीचा घटनास्थळी मृत्यू झाला. जखमी अवस्थेत असलेले वडील मोतीराम मेश्राम यांना उपचारासाठी चंद्रपूरात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर उत्तम चुनारकर (४५), अंकित राजू मेश्राम (१०) हे गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपुरात रेफर करण्यात आले. या घटनेने खापरी गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - Nashik Sahitya Sammelan : साहित्य संमेलनावेळी वाद झाला पाहिजे असा नियम झालाय का? - शरद पवार