चिमूर - राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेले पिक हिरावल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात शेतकऱ्यांनी गहू, चणा, वटाणा व भाजीपाल्याची लागवड केली. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणी करण्याचे संकट आले आहे. कारण वन्यप्राण्यांनी नुकतीच या पिकांची नासाडी केली आहे.
चिमूर तालुक्यात शेतशिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. वहानगाव येथे शेतात पेरलेले दाणे, शेंगा तसेच कापसाची बोंडे माकडं फस्त करीत आहेत. माकडांच्या या वाढलेल्या उच्छादावर वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकरी आता तिहेरी संकटात-
परतीच्या पावसानंतर कपाशी आणि इतर पिकांवर आलेल्या रोगामुळे शेतकरी बेजार झाला आहे. वाचलेल्या पिकांची जंगली डुक्कर, हरीण, व नीलगाय या वन्यप्राण्यांनी नासाडी केली आहे. त्यामुळे शेतकरी आता तिहेरी संकटात सापडला आहे. यात वहानगाव परीसरात माकडांच्या मोठ्या कळपाने उच्छाद मांडला आहे. हा माकडांचा कळप सर्व प्रकारच्या पिकांवर ताव मारीत असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
माकडांच्या कळपांचा बंदोबस्त करण्याची मागणी-
जवळपास पन्नास माकडांचा हा कळप कापसाची हिरवी बोंड तोडून खातो. तर बाकी फेकून देतो. तसेच पेरणी केलेला चणा वेचून खातो, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. पिकांचे नुकसान टाळण्याकरीता वनविभागाने या सर्व माकडांच्या कळपांचा बंदोबस्त करावा. तसेच झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने मनसे उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी केली आहे.
हेही वाचा- पोलिसांच्या “फोर्स वन”ला पुर्वीप्रमाणेच प्रोत्साहन भत्ता मिळणार
हेही वाचा- बिहार निवडणूक : सीमांचलची 'आवाम' ठरवणार बिहारचा 'निजाम'