चंद्रपूर - संस्थात्मक विलगीकरण केंद्रात असलेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. याबाबत ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विलगीकरणात असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी पुण्यातून आली असून ती १५ मेपासून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरणात आहे. ती २४ मे रोजी सायंकाळी सात वाजता शाळेतील नळावर हातपाय धूत असताना काकाजी प्रधान याने शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आतमध्ये प्रवेश केला. त्याने तरुणीचा हात पकडून अश्लील चाळे व शिवीगाळ केली. यावेळी तरुणीच्या ओरडण्यामुळे विलगीकरणात असलेल्या तिच्या बहिणीने व इतर लोकांनी तिच्या दिशेने धाव घेऊन काकाजीला हटकले. ग्रामपंचायतीच्या शिपायाने त्याला शाळेच्या बाहेर काढले. त्यानंतर तो तेथून पळून गेला.
काही वेळाने तरुणीच्या चुलत भावाला आणि सरपंचांना घटनेची माहिती होताच, त्यांनी शाळेकडे धाव घेतली. सर्व हकीकत ऐकल्यावर हे दोघेही आरोपीच्या घराकडे गेले असता काकाजीने तरुणीच्या चुलत भावाला ग्लास फेकून मारला. या सगळ्याप्रकारानंतर काकाजीविरोधात भा.द.वि कलम ९४, ३२३, ३५४, ५०६ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.