चंद्रपूर - गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याती चिमूर तालुक्यातील चिखलापार गावाला पुराने वेढा घातला. सर्व ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य राबवण्यात आले. त्यासाठी उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे स्वतः बचावकार्यात सहभागी झाले. मात्र, गावापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेले आमदार बंटी भांगडीया दहीहंडीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. त्यांनी येथे येऊन स्थितीचा आढावा घेण्याची जराही तसदी घेतली नाही.
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चिमूर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चिखलपार हे गाव पुराने वेढल्या गेले. जवळच असलेल्या सावरगाव येथील दोन्ही तलाव तुडुंब भरल्याने हे तलाव फुटण्याची भीती होती. असे झाले असते तर चिखलापार हे संपूर्ण गावच पाण्याखाली आले असते. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पाऊल उचलत बचावकार्य सुरू केले. यासाठी उपविभागीय अधिकारी बेहरे स्वतः उपस्थित होते. गावातील सरपंच आणि इतर नागरिकांनी यासाठी पूर्ण मदत केली. नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष तुषार शिंदे यांनी देखील आपले ट्रॅक्टर बचाव कार्यासाठी दिले. तसेच शासकीय वाहनांच्या आणि बोटीच्या मदतीने सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते.
दरम्यान याच विधानसभा क्षेत्राचे आमदार दहीहंडीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. ते या गावाकडे जराही फिरकले नाहीत. चिखलापार येथे पुरापासून बचाव करण्यासाठी पक्का रस्ता तयार करून द्यावा यासाठी नागरिक अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. मात्र, ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळेच आज गावावर ही परिस्थिती ओढवली आहे.
दहीहंडीच्या कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसे, आमदार जल्लोषात व्यस्त -
गोटूलालजी भांगडीया, धापूदेवी गोटूलालजी भांगडीया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिमूर येथे सोमवारी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य आकर्षण म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेला बोलवण्यात आले होते. अभिनेत्रीला बघण्यासाठी मोठी गर्दीही जमली होती. मात्र, या ठिकाणापासून काही अंतरावरच चिखलापार गावातील नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होते. याची जाणीव आमदार भांगडीया यांना नव्हती. ते आपल्या कार्यक्रमाच्या जल्लोषात व्यस्त होते. रात्री उशिरापर्यंत या गावात बचाव कार्य सुरू होते. सर्व नागरिकांना चिमूर येथे आणण्यात आले. लोकप्रतिनिधी इतका असंवेदनशील कसा काय असू शकतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी भांगडीया आले होते चर्चेत -
काही दिवसांपूर्वी अशाच एका प्रकरणात आमदार बंटी भांगडीया चर्चेत आले होते. 16 ऑगस्टला क्रांतीदिनी त्यांनी मिक्सर वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे येथे जमलेल्या 25 महिला चक्कर येऊन पडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी भांगडीया टीकेचे धनी झाले होते. आता पुन्हा असाच प्रकार घडला आहे.