चंद्रपूर - माणिकगड प्रकल्पग्रस्तांनी तहसीलदार कार्यालयासमोर 'भीक द्या' आंदोलन केले. माणिकगड सिंमेट कंपनीने जमीन लूटली. त्यात शेती गेली, हाताला रोजगार नाही. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. काही घरातील वृध्द आजारी पडले आहेत. मात्र, त्यांच्या उपचारासाठीही हातात पैसे नाहीत. म्हणून या प्रकल्पग्रस्तांनी आजारी वृध्दाला खाटेसहीत तहसीलदार कार्यालयासमोर ठेवले आणि उपचारासाठी 'भीक द्या भाऊ, भीक द्या' अशी हाक प्रशासनाला दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कोरपणा, राजूरा आणि जिवती तालुक्यातील अनेक कोलाम आदिवासी बांधवांची शेत जमीन माणिकगड सिमेंट कंपनीने हडपल्याचा या प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. जमीन घेतली त्या जमिनीचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. या प्रकल्पग्रस्तांपैकी देऊ कुडमेथे हे वृध्द आजारी पडले. त्यांच्या उपचारासाठी पैसे नसल्याने संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांची खाट तहसीलदार कार्यालयासमोर ठेवली. प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनामुळे राजूरा तहसील कार्यालयासमोर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी आजारी वृध्दाला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
हेही वाचा - भागो... भागो...शेर आया...! चंद्रपुरात मानवी वस्तीत पट्टेरी वाघाचे दर्शन
कोलाम आदिवासी कुटुंबांची जमीन माणिकगड कंपनीने जमीन भूसंपादित केली होती. मात्र, नियमबाह्य जमीन अधिग्रहण, विस्थापित अनुदान, पुनर्वसन, जमिनीचा मोबदला, प्रकल्पग्रस्तांना नोकरी या सर्वांपासून आदिवासी बांधवांना दूर ठेवल्याचा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. माणिकगड प्रकल्पग्रस्तांचा टाहो प्रशासनाला आता तरी ऐकू येईल का? असा प्रश्न संतप्त प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.