चंद्रपूर - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिक कडेकोट बंदोबस्त पाळत आहेत. तर, महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वाहतूक तेलंगणा सरकारने सील केली असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी आज देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे संशयित रुग्ण महाराष्ट्राच्या हद्दीतून तेलंगणात येऊ नये यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा सीमा सील करण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. त्यामुळे, गावागावात शुकशुकाट पसरलेला असतांना 24 तास वाहनांची वर्दळ असलेल्या महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील लक्कडकोट मार्ग शांत पडला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली असून उभ्या वाहनांचा लांबच-लांब रांगा रस्त्यावर दिसत आहेत.
हेही वाचा - चंद्रपूरमध्ये प्रशासनाचा आदेश न पाळणाऱ्या चार दुकानदारांवर कारवाई
आंतरराज्यीय सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या राजूरा तालूक्यातील लक्कडकोट तपासणी नाक्यावर वाहनं रोखण्यात आली आहेत. जनता कर्फ्यूमुळे जड वाहतूक पूर्णपणे थांबली आणि, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. तर, आदीलाबाद, असिफाबाद हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले असून नाका परिसरात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा - पुण्याहून चंद्रपुरात आलेले तब्बल 1085 प्रवाशी 'होम क्वारंटाईन'...