चंद्रपूर - गोरगरीब जनतेला स्वस्त दरात उत्तम जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने शासनाने शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू केला. मात्र, या भोजनात अळ्या आढळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घुग्घुस येथील शिवभोजन केंद्रात हा प्रकार घडला. त्यामुळे गोरगरीब जनतेला कशा प्रकारचा आहार दिला जातो हे समोर आले आहे.
एकूणच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा धक्कादायक प्रकार आहे. बाळा ठाकरे यांच्या जेवणाच्या ताटात अळ्या सापडल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू करण्यात आला. गोरगरीब जनतेला कमी पैशात उत्तम भोजन व्यवस्था मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. रेल्वेस्थानक, बसस्थानक, शासकीय रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालये अशा ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
अवघ्या पाच रुपयांत ही थाळी मिळते. त्यातही स्वच्छता आणि जेवणाचा दर्जा चांगला असण्याची सक्त ताकीद आहे. दुपारी बारा ते दोन या वेळेत हे जेवण उपलब्ध होते. कोरोनाच्या काळात तर या शिवभोजन केंद्रांमुळे सामान्य नागरिकांना मोठा आधार मिळाला.
घुग्घुस येथे श्रीराम वॉर्डात रमाबाई महिला बचत गटाला शिवभोजन केंद्र चालवण्यास देण्यात आले आहे. आज बाळा ठाकरे या व्यक्तीने ही थाळी पार्सलमध्ये घेतली. घरी जाऊन ती ताटात टाकली असता भाजीत चक्क अली आढळली. यावेळी ठाकरे यांनी हे केंद्र गाठले. त्यांनी ताटात असलेली अळी केंद्र चालवणाऱ्या महिलांना दाखवली. यावेळी एखादी अळी चुकून आली असे त्या महिलानी सांगितले. मात्र, भाजीच्या भांड्यात बघितले असता तिथेही अळ्या आढळल्या. यावेळी भोजन बनवणाऱ्या महिलांची बोलती बंद झाली. एकूणच हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. राज्य शासनाच्या उद्देशाला डाग लावणारी ही घटना आहे. जनसामान्यांना अशा प्रकारचे जेवण मिळत असेल तर ही गोरगरिबांची थट्टा आहे. त्यामुळे या केंद्राची मान्यता तात्काळ रद्द करून त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.