चिमूर - संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून तो वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केले आहे. मालकांनी काम बंद केल्यामुळे अनेक परप्रांतीय मजूर शहरात अडकून पडले आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. तहसीलदार संजय नागटिळक यांनी या मजुरांकडे अन्न पोहचवण्याची व्यवस्था शनिवारी केली होती.
शहरात अनेक ठिकाणी विकासकामे सुरू होती. यासाठी ठेकेदारांनी परप्रांतातून मजूर आणले होते. राज्य सरकारने राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३१ मार्चपर्यंत संपूर्ण देशात 'लॉकडाऊन'चा निर्णय घेतला. यानंतर रेल्वे, एसटी, खासगी वाहतूक बंद झाली. सर्वत्र संचारबंदी असल्याने कामे बंद झाली. तसेच, वाहतूक बंद झाल्यामुळे काही मजुरांना घरी परतणेही शक्य झाले नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील सफाई कामगारांचाही यात समावेश आहे. या सर्वांना तहसीलदार नागटिळक यांच्यातर्फे शनिवारी जेवण देण्यात आले.
तलाठी बंडू मडावी, कोतवाल शंभरकर, पोलीस पाटील रामदास राऊत, प्रेसचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, अंगणवाडी कर्मचारी सभेचे जिल्हा अध्यक्ष इम्रान कुरेशी यांनी सहकार्य केले.