चंद्रपूर - बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनदरम्यान केलेली काही थिथिलता त्वरित रद्द केली. सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळाता इतर आस्थापनांना दिलेली सूट स्थगित करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. गुरुवारपासून केवळ जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. चंद्रपुरात आतापर्यंत कोरोनाचा केवळ एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेत काही सूट दिली होती. मात्र, चंद्रपूरकरांचा हा आनंद केवळ दोनच दिवस टिकला आहे.
हेही वाचा... 'मोदींनी जाहीर केलेले आर्थिक पॅकेज फक्त ४ लाख कोटींचेच'
जिल्ह्यात 2 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण शहरातील कृष्णनगर येथे आढळला होता. मात्र, त्याच्या संपर्कात येणारा एकही व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळला नाही. रुग्णाच्या कुटुंबातील तीनही सदस्यांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आले होते. तसेच रुग्ण राहत असलेला परिसर देखील सील करण्यात आला असून तेथील जवळपास 5 हजार लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यातील संशयित व्यक्तींचे नमुने देखील निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 11 मे पासून जीवनावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर दुकाने, बाजारपेठ उघडण्याची मुभा चंद्रपूर जिल्हावासियांना देण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यातील ठप्प पडलेल्या व्यापाराला नवी चालना मिळाली होती.
बुधवारी जिल्ह्यातील व्यापाराचा गाडा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, एक 24 वर्षीय युवतीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. या युवतीच्या आईवर यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 9 मे रोजी ही युवती आपल्या कुटुंबासह चंद्रपुरात घरी परत आली होती. या कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी ही युवती कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. इतर सदस्यांचे अहवाल येणे अजून बाकी आहे.
युवतीच्या कोरोना पॉझिटिव्हच्या अहवालानंतर प्रशासनाने शहरातील बिनबा गेट परिसर सील केला आहे. तसेच पूढील चार दिवस केवळ जीवनावश्यक सेवा उघडण्याची मुभा दिली आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी सुरू झालेली अन्य दुकाने आता बंद ठेवावी लागणार आहेत.