चंद्रपूर - रोजगाराच्या प्रश्नावर स्थानिकांनी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शनिवारी धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. जोरगेवार आणि कंपनी व्यवस्थापन हे आपल्या भूमिकेवर अडून बसल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कंपनी व्यवस्थापन आणि जोरगेवार यांच्यातली चर्चा निष्फळ झाल्याने स्थिती हाताळताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
मोर्चाचे स्वरूप बघता कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी दंगा नियंत्रण पथक दाखल झाले होते. जोरगेवारांच्या मोर्चाला मुख्य द्वारापुढेच रोखण्यात आले. कंपनी व्यवस्थापनाशी निवेदन आणि चर्चा करण्यासाठी केवळ १० जणांना आत पाठविण्याची कंपनीची अट होती. मात्र, सर्वांसमक्ष ही चर्चा व्हावी, या मागणीवर जोरगेवार यांनी ठाम होते. त्यामुळे या दोन्ही बाजूंशी चर्चा करताना आणि समजूत काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. अनेक तास उलटून यावर कंपनी व्यवस्थापनाने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने जोरगेवारांचे समर्थक संतापले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसात चकमक देखील झाली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहिल्यानंतर कंपनी व्यवस्थापन नरमले. जोरगेवारांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना शांत केले. यावेळी जोरगेवारांनी कंपनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आता चर्चा अशक्य असून निवेदनाच्या मागण्यांवर १५ दिवसांच्या आत बैठकीचे आयोजन करा, अशी अट जोरगेवारांनी घातली आहे. यावर कंपनी व्यवस्थापनाने होकार दर्शविला.